चिपळूण: चिपळूणजवळील प्रसिद्ध सवतसडा धबधब्यावर आज स्वातंत्र्यदिनी एक दुर्दैवी घटना घडली. धबधब्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आलेल्या केरळमधील एका 25 वर्षीय तरुण पर्यटकाला पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. राहुल लाल असे त्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या, नाले आणि विशेषतः धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. आज स्वातंत्र्यदिन असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक सवतसडा धबधब्यावर गर्दी करतात. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने राहुल लाल यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन पर्यटकांना अशा धोकादायक ठिकाणी काळजी घेण्याचे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ न जाण्याचे आवाहन करत आहे.