सरपंच फैयाज मुकादम आणि समाजसेवक मकबूल मुकादम यांच्या तत्परतेने अनर्थ टळला
रत्नागिरी, (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील एका विहिरीत पडलेल्या नाग जातीच्या सापाला केळ्ये येथील सर्पमित्र गुरुनाथ बाचरे आणि मोरेश्वर बाचरे यांच्यामुळे जीवदान मिळाले आहे. तब्बल चार दिवस पाण्यावर तरंगत असलेल्या या नागाचा यशस्वी बचाव करण्यात बाचरे बंधूंना यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मजगाव येथील बाग स्टॉपजवळ राहणाऱ्या हसीना इब्जी यांच्या मालकीच्या विहिरीत हा नाग पडल्याचे निदर्शनास आले. जीव वाचवण्यासाठी तो नाग चार दिवस विहिरीतील पाण्यावर तरंगत होता. सापाला बाहेर काढण्यासाठी हसीना इब्जी यांनी अनेक ग्रामस्थांना विनंती केली, मात्र कोणीही पुढे येत नव्हते. अखेर त्यांनी गावाचे सरपंच फैयाज मुकादम आणि समाजसेवक मकबूल मुकादम यांना फोन करून याबद्दल सांगितले. मुकादम यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मकबूल मुकादम यांनी विहिरीत एक डबल दोरी सोडली आणि सरपंच फैयाज मुकादम यांनी केळ्ये येथील सर्पमित्र गुरुनाथ बाचरे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली.
माहिती मिळताच सर्पमित्र गुरुनाथ बाचरे, मोरेश्वर बाचरे आणि वैभव धुलप हे त्वरित विहिरी जवळ पोहोचले. विहिरीत सोडलेल्या डबल दोरीच्या सहाय्याने बाचरे बंधूंनी मोठ्या शिताफीने नागाला विहिरीबाहेर काढले. त्यांनी त्या नागाला सुरक्षितपणे बरणीमध्ये भरले आणि नंतर त्याला मोठ्या जंगलात नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. बाचरे बंधूंच्या या मनुष्यबळामुळे एका नागाला जीवनदान मिळाले, तसेच नाग सुरक्षितपणे आपल्या मार्गाला गेल्यामुळे हसीना इब्जी यांची भीतीही दूर झाली. या सर्पमित्र बंधूंच्या धाडसाचे आणि कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.