रत्नागिरी: नारळ उत्पादनातील घट, अनुकूल हवामानातील बदल यामुळे सुक्या खोबर्याचा दर प्रतिक्रिलो 360 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत दुप्पट दरवाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकाला आर्थिक ताण बसला आहे.
श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये, सणवार , धार्मिक विधी यासाठी सुक्या खोबर्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे चढ्या दरानेच ग्राहकांनी सुक्या खोबर्याची खरेदी करावी लागणार आहे.
स्वयंपाकात मसाल्यासाठी सुक्या खोबर्याचा वापर केला जातो. तसेच धार्मिक कार्यासाठीही सुक्या खोबर्याला मागणी असते. त्यामुळे महिन्याच्या किराणा सामानाच्या यादीत सुक्या खोबर्याचा समावेश असतो. मात्र गेल्या सहा महिन्यांत सुक्या खोबर्याच्या दराचा चढत्या आलेखाने सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जानेवारी महिन्यात 185 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असलेले सुके खोबरे जुलैच्या मध्यापर्यंत 360 रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचले आहे.
दरवाढीमागे नेमकी कारणे काय?
हवामानातील बदलाचा थेट परिणाम नारळ उत्पादनावर झाला आहे. दक्षिण भारतात वाढलेले तापमान आणि अनियमित पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली. त्याचबरोबर, भविष्यात आणखी भाववाढ होण्याची शक्यता गृहीत धरून अनेक शेतकर्यांनी माल साठवून ठेवला आहे. यामुळे बाजारातील पुरवठा कमी होऊन दर वाढले आहेत. श्रीलंका, इंडोनेशियासारख्या देशांकडून होणारी आयातही घटल्याने देशांतर्गत बाजारावर ताण आला आहे.
खिसलेल्या खोबर्याच्या मागणीत घट
सुक्या खोबर्याच्या वाटीबरोबरच बाजारपेठेत रेडिमेड खिसलेल्या खोबर्यालाही मागणी असते. दिवाळीच्या फराळासाठी तसेच रोजच्या स्वयंपाकासाठी वेळेची बचत करण्याकरिता खोबरा वाटीच्या दरापेक्षा दहा रुपये जादा दराने तयार खिस दुकानात विक्रीसाठी ठेवला जात होता. मात्र आता सुक्या खोबर्याचाच दर दुपटीने वाढल्याने तयार खिसलेल्या खोबर्याची मागणी घटली आहे. त्यामुळे खोबरे खिसण्याचे काम करणार्या महिलांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.
दरवाढीची आकडेवारी (प्रतिकिलो)
जानेवारी 185 रु.
फेब्रुवारी 195 रु.
मार्च 220 रु.
एप्रिल 230 रु.
मे 250 रु.
जून 350 रु.
जुलै 360 रु.
सुके खोबरे महागले; प्रतिकिलो दर 350 ते 400 रुपयांवर
