GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या वस्तुसंग्रहालयात साडेसहा हजार कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म

Gramin Varta
17 Views

चिपळूण: भूविज्ञानातील पुराजीवाश्मशास्त्र विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अजित वर्तक (पुणे) यांनी साडेसहा हजार कोटी वर्षांपूर्वीचे दुर्मिळ जीवाश्म नमुने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयाला भेट दिले आहेत.

चिपळूणमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हे नमुने वाचनालयाचे मार्गदर्शक व इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

एका खास कार्यक्रमासाठी डॉ. वर्तक पुण्याहून चिपळूणला आले होते. यावेळी त्यांनी वाचनालयातील तैलचित्र दालन व वस्तू संग्रहालयाला भेट देत समुद्राच्या अधःस्तरातून सापडलेले दुर्मिळ जीवाश्म नमुने कायमस्वरूपी संग्रहित करण्यासाठी दिले. हे जीवाश्म तामिळनाडूतील त्रिचनापल्ली परिसरातील अरीअलुर भागात आढळले आहेत. या भागात पूर्वी समुद्र असल्याने आणि नंतर तो मागे हटल्याने तेथे मोठ्या प्रमाणात खाणींमध्ये प्राचीन समुद्री जीवांचे जीवाश्म आढळतात.

डॉ. वर्तक यांनी याच विषयावर अमोनाइट या खनिजाच्या अभ्यासासह पीएच.डी. केली आहे. त्यांनी सांगितले की अरिअलुर भागातील जीवाश्मांना वैज्ञानिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोठे अभ्यासमूल्य आहे. हे नमुने चिपळूणमध्ये येणे ही स्थानिकांसाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे म्हणाले, वस्तुसंग्रहालयात या जीवाश्मांचा समावेश झाल्याने त्याचे शैक्षणिक महत्त्व अधिक वाढेल. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि इतिहासप्रेमींना प्रत्यक्ष जीवाश्म पाहण्याची संधी मिळेल.

कार्यक्रमास पर्यावरण आणि देवराईसंवर्धन विषयावर कार्य करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले, समालोचक सचिन कुलकर्णी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366910
Share This Article