संगमेश्वर : तालुक्यातील निवे खुर्द परबवाडी येथील जयश्री सावंत (वय 70) या वृद्ध महिलेला आजही स्वतःच्या हक्काचे घर मिळालेले नाही. वयाची ७० वर्षे ओलांडलेली जयश्री या सध्या अत्यंत धोकादायक स्थितीतील कौलारू घरात राहतात. पावसापासून बचावासाठी त्या घरावर फक्त कागद घालून वास्तव्य करत असून, त्यांच्या जीवनाची घडी शासनाच्या घरकुल योजनेच्या मंजुरीवर अडकून आहे.
मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष?
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. शासन विविध योजनांद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करत असले तरी काहींच्या वाट्याला अजूनही ती अपेक्षित मदत आलेली नाही. जयश्री सावंत यांचे घर अनेक वर्षांपासून नादुरुस्त असून, त्याची भिंती आणि छप्पर अत्यंत जीर्ण झाल्याने कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गावात घरकुले मंजूर, पण…
परबवाडीतील इतर अनेक कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजना मंजूर झाल्या असून, त्यांनी नवी घरेही बांधून घेतली आहेत. मात्र जयश्री सावंत या अद्यापही अपात्रतेच्या अंधारात अडकलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीकडून आश्वासन
यासंदर्भात निवे खुर्द ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता, जयश्री सावंत यांचे नाव नुकत्याच झालेल्या नवीन सर्वेक्षण यादीत अग्रक्रमाने समाविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून मंजुरी मिळताच घरकुल उभारणीला सुरुवात होईल, असे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले.
वृद्धेला हक्काचे घर मिळावे हीच अपेक्षा
वर्षानुवर्षे धोकादायक घरात राहणाऱ्या जयश्री सावंत यांना हक्काचे सुरक्षित घर मिळावे, ही ग्रामस्थांसह सर्वांचीच अपेक्षा आहे. शासनाने आणि प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन या वृद्ध महिलेच्या जगण्याला आधार द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.