GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: नवदाम्पत्य आत्महत्या प्रकरण : 36 तासांनी पत्नीचा मृतदेह सापडला

Gramin Varta
33 Views

पुतण्याने आत्महत्या केल्याचे समजताच आत्याचाही मृत्यू

चिपळूण: चिपळूणमध्ये नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (30 जुलै) दुपारी ही घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेला 36 तास उलटल्यानंतर पत्नीचा मृतदेह सापडला असून, याच धक्क्याने पतीच्या आत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेतील पती निलेश अहिरे (वय 26) आणि पत्नी अश्विनी अहिरे (वय 19) हे आहेत. त्यांचे लग्न अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी धुळे येथे मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नानंतर त्यांनी मारलेश्वर, गणपतीपुळे येथे देवदर्शन करून आनंदी क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण एक मोठे गूढ बनले आहे.

बुधवारी दुपारी निलेश आणि अश्विनी यांनी चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केली. निलेशची दुचाकी पुलाजवळच आढळल्याने पोलिसांना आत्महत्येचा संशय आला. तेव्हापासून पोलीस आणि स्थानिकांकडून दोघांचाही शोध सुरू होता. सुमारे 36 तासांच्या शोध मोहिमेनंतर, आज (1 ऑगस्ट) अश्विनी अहिरे यांचा मृतदेह कालू स्टे मजरेकाशी खाडी किनारी आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, निलेशचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेचा आणखी एक हृदयद्रावक पैलू समोर आला आहे. आपल्या पुतण्याने केलेल्या आत्महत्येची बातमी ऐकून निलेशच्या आत्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला, यात त्यांचे निधन झाले. एकाच कुटुंबावर एकामागोमाग एक दोन मोठे आघात झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे लग्न निलेशच्या इच्छेविरुद्ध झाल्याची चर्चा आहे. आत्महत्येपूर्वी अश्विनीने आपल्या मामाला फोन करून “मी आत्महत्या करणार आहे,” असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर तिने काहीही न बोलता फोन कट केला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2648192
Share This Article