संगमेश्वर : तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस येथील शास्त्री नदीच्या खाडीत एका ३० ते ४० वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना ३० जून रोजी उघडकीस आली असून, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मेढे तर्फे फुणगुस येथील राई भादगाव पुलाखाली शास्त्री नदीच्या खाडीत मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या भागाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे मांजरे गावचे पोलीस पाटील दिपक कमलाकर सावंत यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खाडीच्या पाण्यात मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला असून, तो साधारणपणे ३० ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा आहे. अज्ञात कारणांमुळे या तरुणाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. ३० जून रोजी रात्री २२.११ वाजता या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, मयताच्या अंगावर कपडे किंवा ओळख पटवणारे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने पोलीस परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत आहेत. मृतदेहाची अवस्था पाहता, तो काही दिवसांपासून पाण्यात असावा असा संशय व्यक्त केला जात असून, पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण पसरले आहे.
