दोडामार्ग : तिलारी येथे एका कारला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या कारमधून मांस तस्करी होत असल्याच्या संशयावरून कारला आग लावल्याची चर्चा होती. याप्रकरणी पोलिसांनी दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी पोलिस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली. यामुळे दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्याला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घाट माथ्यावरून एक स्विफ्ट कार गुरुवारी दुपारी दोडामार्ग मार्गे गोव्याला जात होती. तिलारी येथे ही कार आली असता काही अज्ञातांनी त्यात गोमांस असल्याचा संशय व्यक्त कार थांबवली. आत मध्ये मांस दिसताच ती कार पेटवून दिली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. कारमधून काही मांस बाहेर फेकल्याची चर्चा सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अति.पोलीस अधीक्षक नयोमी साटम या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ राज्य मार्ग दोन्ही बाजूने बंद केला. घटनास्थळी सर्व पाहणी केली.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. घटनेची तीव्रता लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. शहरासह मुख्य ठिकाणी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला. सायंकाळी उशिरा कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे हे दोडामार्ग मध्ये दाखल झाले. घडलेल्या घटनेबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना माहिती देण्यास पोलिसांनी टाळले. शिवाय चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मारहाणीत कार चालक गंभीर
दरम्यान कार चालकाला काहिंनी मारहाण केली. यात तो जबर जखमी झाला. त्याला तात्काळ दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली.
नगराध्यक्षांसह दोघे चौकशीसाठी ताब्यात
घटनेच्या अवघ्या काही तासांनंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सायंकाळी 6.30 वा.च्या सुमारास चौकशीसाठी बोलावलेल्या नगराध्यक्ष चव्हाण यांची अडीच तासाहून अधिक वेळ चौकशी सुरू होती. यादरम्यान आणखी दोघांना चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.
सिंधुदुर्ग: गोमांस वाहतुकीच्या संशयाने कार पेटवली
