GRAMIN SEARCH BANNER

ऐन गणेशोत्सवात नाराळाची आवक घटली, मोदक महागले

मुंबई: दक्षिणेतील राज्यात पावसाळ्यात उष्णता वाढल्यानं नारळ खराब होत त्यांना कीड लागली. त्यामुळं यंदा नारळाची आवक कमी झाली आहे. परिणामी, गणेशोत्सवामुळं नारळाची मागणी जास्त आणि आवक कमी असल्यानं नारळाचे भाव दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत.

तसंच सुके खोबऱ्यांची किंमत 400 रुपये किलोपर्यंत गेल्यानं गणेशोत्सवाच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा फटका बसणार आहे.

सणासुदीत प्रसाद, देवपूजा, मिठाई, मोदक या पदार्थासाठी नारळ खोबऱ्याची मोठी मागणी असते. मात्र, यंदा दक्षिणोत्तर राज्यामध्ये पावसाळ्यात उष्णता वाढल्यानं नारळांना कीड लागली. जिथं एका झाडावर 100 नारळ येत होते, तिथं केवळ 55 ते 60 नारळं मिळाली असल्यानं नारळाची आवक घटली आहे. त्यामुळं नारळ, खोबरे आणि खोबरेल तेलाचं भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 30 ते 35 रुपयांचे नारळ आता 40 ते 45 रुपये तर घरामध्ये वापरले जाणारे सुके खोबरे चारशे रुपये किलोपर्यंत पोहचले आहे. खोबरेल तेलही दुप्पटीनं महाग झालं आहे. भाजीसाठी लागणाऱ्या शेंगदाणा तेलापासून खोबरेल तेल दुप्पटीनं महाग झाले आहे. अडीचशे ग्रॅम खोबरेल तेलाची बाटली तब्बल 192 रुपयांना मिळत आहे. गणेशोत्सव आल्यामुळं नागरिकांना नारळ, सुके खोबरे , खोबऱ्याचा कीस चढ्या भावानं विकत घ्यावं लागत आहे.

आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे या दिवसात गौरी-गणपतीला खिरापतीचा प्रसाद दिला जातो. परंतु महत्त्वाच्या सणात नारळ महाग झाल्यानं खोबऱ्याचा कीस 600 ते 650 रुपये किलो मिळण्याचा अंदाज नारळ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. यासोबतच मिठाईत देखील नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, नारळ महागल्यानं नारळाचे मोदक, लाडू आणि मिठाईदेखील महाग झाली आहे.

शहरात केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या भागातून दररोज साधारण 60 हजार नारळाची आवक होते. मागील दोन महिन्यापासून नारळ आणि खोबऱ्याचे दर सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळं ग्राहकांकडून मागणी देखील 20 टक्क्यानं कमी झाली आहे. दिवाळीपर्यंत दक्षिणोत्तर भागात नव्यानं नारळाचे पीक आल्यानंतर भाव कमी होईल, अशी आशा असल्याचं नारळ व्यावसायिकानी सांगितले.

Total Visitor Counter

2474805
Share This Article