रत्नागिरी: शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ३ जुलै २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या आईने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या प्रमोद कदम या शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा ३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला आणि दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी परतला. यावेळी त्याने आपला कान दुखत असल्याचे आईला सांगितले. आईने कानाला काय झाले असे विचारले असता, शाळेतील शिक्षक प्रमोद कदम यांनी मारहाण केल्याचे त्याने सांगितले. यानंतर मुलाला तातडीने कान-नाका-घशाच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी विविध तपासण्या करून कानाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असल्याचे निदान केले. या प्रकारानंतर, मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या आईने प्रमोद कदम या शिक्षकाविरुद्ध शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.