GRAMIN SEARCH BANNER

दापोली जालगाव येथे कौटुंबिक वादातून महिलेवर सुरीहल्ला; तिघांविरोधात गुन्हा

दापोली : जालगाव बाजारपेठेत एका कौटुंबिक वादाने भीषण रूप धारण करत शनिवारी सकाळी एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नम्रता भाटकर या महिलेवर मारहाण करत तिच्यावर सुरीने वार केल्याप्रकरणी तिच्याच नात्यातील तिघांविरोधात दापोली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास नम्रता भाटकर घराच्या अंगणातील स्वच्छता करत असताना कचरा टाकण्याच्या कारणावरून तिची जाऊ विनिता भाटकर यांच्याशी वाद झाला. हा वाद पुढे पती विनोद भाटकर यांच्यापर्यंत पोहोचताच परिस्थिती चिघळली. संतापलेल्या विनोद यांनी नम्रताला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर घटनास्थळी नम्रताचा दीर विलास भाटकर आला. त्यानेही शिवीगाळ करत हातातील भाजी चिरायची सुरी वापरून नम्रताच्या उजव्या हातावर व मनगटावर वार करून तिला जखमी केले, असे पोलिसांनी सांगितले.

नम्रता भाटकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विनोद भाटकर, विलास भाटकर आणि विनिता भाटकर (रा. जालगाव बाजारपेठ) या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3483456
Share This Article