GRAMIN SEARCH BANNER

रेल्वेतून प्रवाशाचा ९६ हजारांचा आयफोन चोरीला, चोरीचे लोकेशन रत्नागिरीत; गोवा पोलिसांकडून गुन्हा वर्ग

Gramin Varta
241 Views

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसताना, ओखा एक्सप्रेसमधील आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. अहमदाबादहून गोव्याकडे प्रवास करणाऱ्या एका तरुण स्थापत्य अभियंत्याचा तब्बल ९६ हजार रुपये किमतीचा आयफोन अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. विशेष म्हणजे, या चोरीचे लोकेशन रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्याने, हा गुन्हा तपासासाठी गोवा पोलिसांकडून रत्नागिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश विश्वास देसाई (वय २३, व्यवसाय – स्थापत्य अभियंता) हे मूळचे मडगाव, गोवा येथील रहिवासी असून सध्या बेंगळुरू येथे वास्तव्यास आहेत. २७ जानेवारी २०२५ रोजी ते ट्रेन क्रमांक १६३३७ ओखा एक्सप्रेसने अहमदाबाद येथून गोव्याकडे प्रवास करत होते. पहाटे सुमारे ४.४५ वाजता ही रेल्वे रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात आली असताना, रितेश देसाई आपल्या सीटवर झोपले होते.

प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून पांढऱ्या रंगाचा अ‍ॅपल आयफोन १६ अत्यंत शिताफीने चोरून नेला. चोरीनंतर मोबाईलचा शोध घेत असताना, संबंधित मोबाईलचे शेवटचे लोकेशन रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची प्राथमिक तक्रार रितेश देसाई यांनी ई-मेलद्वारे गोवा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार कोकण रेल्वे पोलीस ठाणे, मडगाव (गोवा) येथे ‘झिरो नंबर’ (००/२०२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान चोरीचे ठिकाण रत्नागिरी असल्याचे स्पष्ट झाल्याने, गोवा पोलिसांनी गुन्ह्याची सर्व कागदपत्रे रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग केली. त्याअनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०३(२) (चोरी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3379938
Share This Article