रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला स्वप्नील बाळू पाचकुडे हा बुधवार २ जुलै दुपारी रत्नागिरीतील जाकादेवी परिसरात आढळला. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २ जुलै रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जाकादेवी ते खालगाव जाणाऱ्या रोडवर, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सार्वजनिक रस्त्यावर घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक अनिरुद्ध राजवैद्य (वय ४६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. मावळती, पाचकुडेवाडी, करबुडे, ता.जि. रत्नागिरी) याला मा. उपविभागीय दंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या न्यायालयाने २७ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशानुसार (क्र. हद्दपार- एसआर- ०६/२०२३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.
न्यायालयाचा आदेश प्राप्त होऊनही, पाचकुडेने त्याचे पालन केले नाही आणि तो जाकादेवी येथे आढळून आला. यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४१ आणि १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी पुन्हा रत्नागिरीत

Leave a Comment