रत्नागिरी: गुन्हेगारी तपासाला वैज्ञानिक आणि जलद गती देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोकण परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री. संजय दराडे (भा.पो.से.) यांच्या शुभ हस्ते दिनांक २५/०९/२०२५ रोजी येथे “मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन युनिट” चे शानदार उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता गंभीर गुन्ह्यांच्या तपासात मोठे बदल होणार असून, गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS) या नवीन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी पोलीस दलाला ही अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. ही व्हॅन गुन्ह्यांचे घटनास्थळ तातडीने संरक्षित करून भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे जागेवरच गोळा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. गुन्ह्याचा तपास अधिक जलद आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी हे युनिट मैलाचा दगड ठरेल. यामुळे घटनास्थळावरून गोळा केलेले पुरावे त्वरित सुरक्षित करणे आणि ते न्यायालयात सादर करणे अधिक सोपे होईल, परिणामी गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास पोलीस दलाने व्यक्त केला आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांच्यासह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी, उप विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) श्रीमती. राधिका फडके, तसेच पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे (स्था.गु.अ.शा.) आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांचा समावेश होता. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या या अत्याधुनिक उपक्रमाबद्दल कौतुक केले आणि या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याचे निर्देश दिले. आता हे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन युनिट रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी तपासाला नवा आयाम देण्यास सज्ज झाले आहे.