नागपंचमीला मूर्ती तयार, रंगकाम तृतीयेला, थिबा राजाच्या मेण्यातून आगमन
सचिन यादव / संगमेश्वर
कोकणात गणेशोत्सवाच्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. ह्या सगळ्या वर्षानुवर्षे श्रद्धेने पाळल्या जातात. अशीच एक परंपरा म्हणजे लाल गणेशाची पाच पिढ्या आणि दोनशे वर्ष चालत आलेली परंपरा. रत्नागिरी येथील मूर्तीकार शिवा पाटणकर यांनी बोलताना माहिती दिली.
शेटये कुटुंबियांचा हा नवसाला पावणारा गणेश म्हणून ह्या गणेशाची ओळख आहे. ही मूर्ती नागपंचमीच्या दिवशीच काढली जाते. शेटये यांनी नागपंचमीच्या दिवशी गणेशाचा पाट मूर्तीकार पाटणकर यांच्याकडे सुपूर्द केल्यावर त्याची विधीवत पूजा केली जाते आणि लगेच त्यावर मूर्ती तयार करण्यास प्रारंभ केला जातो. पुर्णपणे मातीची असलेली ही मूर्ती नागपंचमी संपण्याच्या आत म्हणजेच रात्री बारा वाजण्यापूर्वी तयार करून पूर्ण केली जाते. ह्या वेळी पाटणकर यांच्या घरातील स्त्रिया गणेशासाठी आवश्यक मुहूर्ताची शाडूमाती मळण्याचे काम करतात. राघोबा पाटणकर यांनी ही मूर्ती काढायला प्रारंभ केला. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र बाबीशेट यांनी ही प्रथा सुरू ठेवली.
तिसर्या पिढीत विठोबा यांनी ही प्रथा पुढे नेली. दत्तात्रय ओयटणकर हे चौथ्या पिढीतील मूर्तीकार हा गणेश काढत असत. आता सात आठ वर्षे संजय उर्फ शिवा पाटणकर हे ही जबाबदारी पार पाडत आहेत. पिढ्यांपिढ्या मूर्तीमध्ये फरक करण्यात आलेला नाही. पीतांबर, हिरवा शेला आणि मूर्ती पुर्णपणे लाल रंगाची ही प्रथा पाळण्यात येते. ह्या गणेशाचा संबंध थेट थिबा राजाशी आहे. थिबा राजा हा श्रद्धाळू असल्याने त्याने ह्या गणेशासाठी मेणा दिला होता. त्याच मेण्यातून गणपती शेटये यांच्या घरी येत असे आणि त्याच मेण्यातून तो विसर्जनासाठी नेण्यात येत असे. थिबा राजा स्वत: शेट्यांच्या घरी दर्शनास येत असे. कुटुंब म्हटले की चांगल्या वाईट घटना आल्याच. पण पाटणकरांच्या पाच पिढ्यात नागपंचमीच्या दिवशी कधीही सुवेर अथवा सूतक आलेले नाही. त्यामुळे ही प्रथा निर्विघ्नपणे सुरू असल्याचे शिवा पाटणकर सांगतात.
पाच पिढ्या आणि दोनशे वर्षांची परंपरा असलेला शेटये यांचा लाल गणेश
