लांजा : नगर पंचायत हद्दीतील कनावजेवाडी सार्वजनिक स्मशानभूमीतून ३१ धातूच्या प्लेटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही चोरी गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असून, अखेर १४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अनंत राजका रेवाळे (वय ३५, रा. गवाणे रेवाळेवाडी, ता. लांजा) तसेच अन्य एक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रविंद्र विजय कांबळे (वय ४३, रा. बौद्धवाडी, लांजा) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, स्मशानभूमीत शवदहन स्टँडवर लावण्यात आलेल्या मिड धातूच्या एकूण ३१ प्लेटा अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून चोरल्या आहेत. प्रत्येक प्लेटाची किंमत सुमारे १,००० रुपये असून एकूण चोरीस गेलेल्या मालाची किंमत अंदाजे ₹३१,०००/- इतकी आहे.
या प्रकरणात दोन संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. एक काळपट रंगाचा शर्ट घातलेला इसम (जो लिंगायत गुरव समाजातील असल्याचे सांगितले जाते) आणि दुसरा पिवळा शर्ट घातलेला अनंत राजका रेवाळे (वय ३५, रा. गवाणे रेवाळेवाडी, ता. लांजा) यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी संगनमत करून नगर पंचायतीच्या मालकीच्या या धातूच्या प्लेटा संमतीशिवाय चोरून नेल्या.
सदर प्रकरणाची लांजा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या चोरीमागे आणखी कोणी सामील आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.
धक्कादायक चोरी : लांजा स्मशानभूमीतून ३१ धातूच्या प्लेटा चोरीला; दोघांवर गुन्हा
