राजापूर : तालुक्यातील नाणार येथे आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या १९ वर्षीय मनिष गोपी स्वाँसी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनिष गोपी स्वाँसी (वय १९, रा. लटुली ससानबेरा, टुमानगढ, तोरपा, खंटी, झारखंड) हा नाणार येथील समीर प्रभुदेसाई यांच्या आंब्याच्या बागेत साफसफाई आणि देखभालीसाठी आला होता. बागेतील काम आटोपल्यानंतर त्याला ताप येऊ लागला, त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार सुरू होते आणि तो राहत्या ठिकाणी आराम करत होता.
१५ जून २०२५ रोजी सकाळी ८ सुमारास, मनिषचा चुलत भाऊ जेबियर याने बागेचे मालक समीर सुहास प्रभुदेसाई (वय ४३, रा. चव्हाणवाडी, कन्या शाळेजवळ, राजापूर) यांना माहिती दिली की, मनिषला खूप ताप येत असून तो मोठ्याने ओरडत आहे. ही माहिती मिळताच समीर प्रभुदेसाई तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मनिषची पाहणी केली आणि त्याचा चुलत भाऊ जेबियर तसेच बागेतील इतर कामगारांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनिष गोपी स्वाँसी याची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. मनिषच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.