प्रथमच कार्यकारिणीवर महिलांना संधी
संगमेश्वर: संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या (DNE १३६) अध्यक्षपदी श्रीमती सौ. नियती योगेश चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात प्रथमच या संघटनेच्या अध्यक्ष, सचिव आणि संपूर्ण कार्यकारिणीवर महिलांना बिनविरोध निवडून एक नवा आणि आगळावेगळा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक १२ रोजी संघटनेचे मावळते तालुकाध्यक्ष श्री. रवींद्र लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याच सभेत संघटनेची नुतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वर्गाच्या पाल्यांनी विविध परीक्षांमध्ये संपादन केलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचा गुणगौरवही करण्यात आला.
नुतन तालुका कार्यकारिणीची निवड करताना सदस्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. जिल्ह्यात प्रथमच संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीवर महिलांना संधी देऊन एक मोठा बदल घडवला. यामध्ये अध्यक्षपदी श्रीमती नियती योगेश चव्हाण यांची, तर सचिवपदी श्रीमती तृप्ती योगेश मोहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, उपाध्यक्षपदी श्रीमती संजीवनी संतोष गवंडी, सहसचिवपदी श्रीमती समिक्षा समीर मोहिते, सल्लागारपदी श्रीमती मेघा रवींद्र सुवारे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीमती श्रृती रूपेश सावंत, जान्हवी मंदार आंबेकर, गितांजली हिरालाल चावरे आणि सोनम कुंभार यांचीही सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या राज्य संघटनेवर संगमेश्वर तालुक्यातून श्रीमती शैला कृष्णा नटे यांची महिला कौन्सिलर म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या सर्व सभासदांनी नुतन तालुका कार्यकारिणी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष रवींद्र लोटणकर, सचिव श्री. राजेंद्र पाटील, पतसंस्था संचालक श्री. राजेश इंदूलकर, श्री. अनिल गोपाळ, श्री. सुहास शिंदे, श्री. रमेश चाळके, श्री. अखिलेश गमरे, आणि श्री. प्रशांत शेट्ये यांनी नुतन तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर नुतन अध्यक्ष श्रीमती नियती चव्हाण यांनी संघटनेचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले. महिलांना दिलेले हे नेतृत्व निश्चितच संघटनेच्या कार्याला नवी दिशा देईल, असा विश्वास यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.