रत्नागिरी: तालुक्यातील कळझोंडी गणेशवाडी येथे मंगळवारी दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. घरमालक घरी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र झराजी निंबरे (वय ४६) हे मजुरीचे काम करतात. मंगळवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० वाजेच्या दरम्यान ते घराबाहेर असताना ही चोरी झाली. चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजाची आतील कडी कोणत्यातरी अज्ञात हत्याराच्या सहाय्याने बाहेरून उचकटून घरात प्रवेश केला. कपाटातील १८ हजार रुपये किमतीची सोन्याची पुतळी, ४२ हजार रुपये किमतीची साईबाबांचे चित्र असलेली ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४२ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅमची बदाम आकाराची दुसरी सोन्याची अंगठी, ९ हजार रुपये किमतीची सोन्याचा मणी असलेली चांदीची सर आणि १ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
रामचंद्र निबरे सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी तत्काळ जयगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा वेगाने फिरवली आहे.
रत्नागिरी : कळझोंडी येथे घरफोडी; सव्वा लाखाचे दागिने, रोकड लंपास






