GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत एस.टी. बसमधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यास गावठी बंदुकीसह अटक

Gramin Varta
199 Views

दापोली: तालुक्यातील भडवळे शेरी भोईवाडी बस स्टॉप येथे उभ्या असलेल्या एस.टी. बसमधून डिझेलची चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला दापोली पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीची बंदूक आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम मनोहर रूखे (रा. दयाळ रुखेवाडी, खेड) या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मार्च २०२६ रोजी रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निवृत्ती सखाराम पवार हे एस.टी. महामंडळाचे वाहक असून त्यांची बस (क्र. MH 20 BL 1535) भडवळे गावी मुक्कामी होती. रात्रीच्या सुमारास आरोपी गौतम रूखे हा आपल्या वॅगनर गाडीतून (क्र. MH 01 DR 3451) त्या ठिकाणी आला. त्याने बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून पाईपच्या साहाय्याने डिझेल चोरण्यास सुरुवात केली. चोरी करत असतानाच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातील वॅगनर गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेली एक १२ बोअरची सिंगल नळीची गावठी बनावटीची बंदूक आणि १२ बोअरचे जिवंत काडतूस आढळून आले. 

या गंभीर प्रकारानंतर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४६/२०२६ नुसार बी.एन.एस. कलम ३०५ (बी) (इ) आणि शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ (१-ख) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या कारवाईची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तोरसकर आणि पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. पोलीस हवालदार अभिजित पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीचा कोणताही पूर्व इतिहास आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Total Visitor Counter

3391871
Share This Article