रायगड ः मेंढ्यांच्या झुंजीवर जुगार लावून खेळणार्या 75 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 1 कोटी 37 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाली पोलिसांनी तालुक्यातील गोंदाव गावचे हद्दीत असललेल्या टायगर गोट फार्म हाऊसममध्ये ही धाड टाकली आहे.यापैकी मुख्य दोन आरोपी फरार आहेत.
तालुक्यातली नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू असतानाच गोंदाव येथील हद्दीत असललेल्या टायगर गोट फार्म हाउसममध्ये मेंढ्यांच्या झुंजीवर पैसे लावुन जुगार खेळविला जात असल्याची पक्की खबर खबर्यांमार्फत पाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हेमलता शेरेकर व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर यांच्या नेतृत्वाखालील दोन पथकांनी एकत्रपणे गोंदाव येथील टायगर गोटफार्म फार्महाउसवर छापा मारला.
त्यावेळी तेथे मेंढ्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळला जात असल्याचे पाहणीत आढळून आले.पोलिसांनी तेथे असलेल्या सर्वांनाच ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यावेळी 1 कोटी 37 लाखांचा मुद्देमाल मिळुन आला. त्यामध्ये जुगार साहित्य, रोख रक्कम, मेंढे व मेंढे वाहतुक करण्यास वापरलेली वाहने यांचा समावेश आहे.
अड्डा चालविणारे दोघे फरार
चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार हा जुगार अड्डा इम्रान कुरेशी रा. कलिना कुर्ला मुंबई, अतिक शेख, रा. पुणे हे चालवित होते. हे दोघे आर्थिक फायद्याकरीता मेंढ्यांच्या झुंजीसाठी जागा उपलब्ध करुन तेथे जुगारावर पैसे लावत होत असत. त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 4,5,12 (ब) (क) व प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (एम) (एन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एम.निकम हे करत आहेत.
रायगड: मेंढ्यांच्या झुंजीवर जुगार; 75 जण ताब्यात
