गॅसच्या महागाईने पेटला कोळसा आणि लाकूडफाटा; इलेक्ट्रिक उपकरणांना मोठी मागणी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

मुंबई: आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाच्या ठिणगीमुळे गॅस टंचाई निर्माण झाली असून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असल्याने अनेकांनी आता स्वयंपाकासाठी पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही पर्यायांकडे धाव घेतली आहे. यामुळे बाजारपेठेत एका बाजूला विजेवर चालणाऱ्या उपकरणांची मागणी २० टक्क्यांनी वाढली असतानाच, दुसरीकडे पुन्हा एकदा कोळसा आणि जळाऊ लाकडांना सोन्याचे दिवस आले आहेत.

​स्वयंपाकाचा खर्च कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक कुकर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कुकटॉप, ओटीजी, टोस्टर, ग्रील आणि एअर फ्रायर यांसारख्या साधनांच्या खरेदीवर भर दिला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या साहित्यासाठी बाजारात अचानक किमान वीस टक्के मागणी वाढली असून मागणी अशीच वाढत राहिली तर भविष्यात या वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे पर्याय अनेक वर्षांपासून उपलब्ध असूनही गॅसच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक आता या उपकरणांना पसंती देत आहेत.

​केवळ इलेक्ट्रिक उपकरणेच नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागात पुन्हा एकदा लाकूड आणि कोळशाची मागणी वाढू लागली आहे. कोळसा व्यापारी विनायक पाटील यांनी सांगितले की, सध्या कोळशाचा दर ४० रुपये किलोवर स्थिर असला तरी तंदूर भट्टी, ढाबा चालक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. हॉटेल चालक आता पुन्हा एकदा कोळशाच्या शेगडीकडे वळू लागले आहेत. दुसरीकडे, लाकूड व्यापारी इलाई मुजावर यांनी सांगितले की, सध्या रमजान महिना असल्याने इफ्तारचे जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. गॅसची टंचाई आणि महागाईमुळे आता हॉटेलचालकही सरपण आणि लाकडांची मागणी करू लागले आहेत. एकूणच गॅसच्या किमतींनी सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडल्याने कोळसा, लाकूड आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या मागणीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *