गणपतीपुळे मंदिरातील लाडू प्रसाद बंद ; गॅस तुटवड्यामुळे देवस्थानला फटका

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

गणपतीपुळे / वैभव पवार :महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिला जाणारा प्रसिद्ध लाडू प्रसाद सध्या बंद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावामुळे आणि अमेरिका-इराण-इस्रायल या देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका आता देवस्थान व्यवस्थेलाही बसू लागला आहे.युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशभरात गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम गणपतीपुळे येथील मंदिरातील प्रसाद व्यवस्थेवरही झाला असून लाडू प्रसाद तयार करण्यासाठी लागणाऱ्या गॅसच्या तुटवड्यामुळे हा प्रसाद तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.याशिवाय मंदिरात दुपारच्या सत्रात भाविकांना दिला जाणारा खिचडी प्रसाद आणि सायंकाळी देण्यात येणारा पुलाव भात देखील सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केवळ श्रींचे दर्शन घेऊनच परतावे लागत असून अनेक भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.देवस्थान समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यवस्था तात्पुरती असून गॅस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे लाडू प्रसाद तसेच अन्य प्रसाद व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता थेट धार्मिक स्थळांवरही जाणवू लागल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *