चिपळूण: दिवाळी सणाच्या निमित्ताने राजकीय संबंध अधिक दृढ करण्याच्या परंपरेला जपत चिपळूणमध्ये नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि खेळीमेळीचा सोहळा पार पडला. येथील आमदार भास्कर जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. या निमित्ताने राजकीय कुरघोडी विसरून सर्वपक्षीयांमध्ये एक अनोखा एकोपा आणि संवाद दिसून आला, जो सणाच्या आपुलकीच्या वातावरणात अधिकच खुलून आला.
दिवाळीच्या या मंगलमय पर्वात एकमेकांना भेटणे, शुभेच्छा देणे आणि फराळ वाटप करणे हा भारतीय संस्कृतीतील आपुलकीचा भाग मानला जातो. यातूनच नेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांचे राजकीय तसेच सामाजिक संबंध अधिक घट्ट होत असतात. आमदार जाधव यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत उत्साहाच्या वातावरणात दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
आमदार जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित या स्नेहमेळाव्याला माजी आमदार बाळ माने, रमेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अशोक कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्यासह शहरातील विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय, माजी नगरसेवक, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक यांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांना एकत्र संवाद साधण्याची एक उत्तम संधी मिळाली. दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र फराळाचा आस्वाद घेतल्याने चिपळूणच्या राजकीय क्षेत्रात सलोख्याचा संदेश गेला असून, सणाच्या निमित्ताने नेत्यांमधील ‘मनभेद’ संपवून केवळ ‘मतभेद’ कायम ठेवण्याचा नवा पायंडा पडल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.







