GRAMIN SEARCH BANNER

ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा मातोश्रीवर भेट; जवळपास ४० मिनिटे चर्चा

Gramin Varta
8 Views

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त एकत्रितपणे दिसले.

यावेळी उद्धव ठाकरे आपल्या पत्नी आणि मुलासह या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे, राज ठाकरे हेही सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. काही वेळातच उद्धव ठाकरे देखील तेथे दाखल झाले आणि दोन्ही बंधूंमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता रंगू लागल्या आहेत.

राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथील एमसीए क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या आधीच बाहेर पडले आणि काही मिनिटांतच ‘मातोश्री’वर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील मातोश्रीवर पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बंधूंमधील चर्चा ‘मातोश्री’च्या पहिल्या मजल्यावर शांत वातावरणात झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांसंदर्भात संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे.

यापूर्वीही ५ जुलै २०२५ रोजी दोन्ही बंधू एकत्र मराठी भाषा समारोहाच्या मंचावर आले. २७ जुलै २०२५ राज ठाकरे ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर 10 सप्टेंबरला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले, त्या वेळी संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांत ही पाचवी भेट असल्याची माहिती आहे. या वाढत्या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याची शक्यता राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

Total Visitor Counter

2651778
Share This Article