GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत 897 जणांची अवयवदान नोंदणी; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

‘अंगदान जीवन संजीवनी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य विभागाने 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबवलेल्या ‘अंगदान जीवन संजीवनी’ अभियानाला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेत तब्बल 897 व्यक्तींनी अवयवदानाचा संकल्प केला असून, त्यात 770 जणांनी ऑनलाइन आणि 127 जणांनी ऑफलाइन नोंदणी केली आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तीन अवयवदात्यांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये कै. रतन सुर्वे यांचे सुपुत्र रमेश रतन सुर्वे, कै. सुशिला मांडवकर यांचे सुपुत्र प्रदीप मांडवकर व जावई निल झगडे आणि कै. श्रीधर दत्तात्रय जोशी यांचे नातेवाईक योगेश रमेश जोशी यांचा समावेश होता.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती केली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये अवयवदान शिबिरे घेण्यात आली. तसेच वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व आशा कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले.

रत्नागिरीकरांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यात अवयवदान चळवळीला नक्कीच मोठी गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2474868
Share This Article