GRAMIN SEARCH BANNER

दापोली: पालगड येथील हार्डवेअर दुकान फोडणारा चोरट्याला दापोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ३२ हजारांचे साहित्य जप्त

Gramin Varta
11 Views

दापोली: तालुक्यातील पालगड पवारवाडी येथील एका हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागील लोखंडी जाळी उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानातून सुमारे ३२ हजार १० रुपये किमतीचे विविध साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती. या घरफोडीप्रकरणी दापोली पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत २४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आकाश सुनील पवार (वय २४, रा. वनौशी तर्फे नातू, ता. दापोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालगड बेलवाडी येथे राहणारे अभिजित विठोबा कदम (वय ३४, व्यवसाय- गाडी धंदा) यांनी याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पालगड पवारवाडी येथे कदम यांच्या मालकाचे हार्डवेअरचे दुकान आहे. मंगळवार, १२ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते बुधवार, १३ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वीच्या कालावधीत चोरट्याने या दुकानाला लक्ष्य केले. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील लोखंडी जाळी कोणत्या तरी हत्याराने उचकटली आणि दुकानात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. चोरट्याने दुकानातून २४ हजार रुपये किमतीचे ४ एमएम सर्विस वायरचे एक बंडल, १४५० रुपयांचे दोन सिलिंग फॅन, विविध प्रकारचे रेड्यूसर, पाईप, वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ६३ नग ‘वे’, ब्लॅक टी, २ कोर वायर आणि होज निपल असे एकूण ३२ हजार १० रुपयांचे हार्डवेअरचे साहित्य चोरून नेले होते.

याप्रकरणी शुक्रवार, १५ मे रोजी मध्यरात्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दापोली पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून संशयित आरोपी आकाश सुनील पवार याला शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दापोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3390219
Share This Article