राजन लाड | जैतापूर
नाटे बाजारपेठेतील सात दुकाने २९ जून रोजी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाली. या आगीत स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या संकटसमयी आमदार किरण (भैय्या) सामंत आणि त्यांच्या कन्या अपूर्वा सामंत यांनी मदतीचा हात पुढे करत व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला. या सहकार्याबद्दल नाटे व्यापारी संघटनेकडून आमदार सामंत व अपूर्वा सामंत यांचे औपचारिक आभार मानण्यात आले.
आग लागल्यानंतर काही दिवसांतच अपूर्वा ताई सामंत यांनी नाटे गावात भेट देत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. व्यापाऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून अपूर्वा ताई सामंत फाउंडेशनमार्फत निकिता गोसावी हिला १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. यासोबतच आमदार किरण सामंत कुटुंबाच्या वतीने अधिक ५० हजार रुपयांची मदत इतर व्यापाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी अपूर्वा ताईंनी स्थानिक व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांना धीर दिला. या सहकार्याबद्दल नाटे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. रमेश लांजेकर यांनी व्यापारी मंडळाच्या वतीने औपचारिक आभारपत्र देत आमदार व त्यांच्या कन्येच्या मदतीचे कौतुक केले.
“संकटाच्या काळात दिलेल्या या आर्थिक व मानसिक पाठबळामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,” असे लांजेकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले.
नाटे व्यापाऱ्यांच्या संकटाला मदतीचा हात; आमदार किरण सामंत, अपूर्वा सामंतांचे व्यापारी संघटनेकडून आभार
