GRAMIN SEARCH BANNER

राजापूर नाटे शाळेतून पोषण आहाराचा तांदूळ चोरी प्रकरणी मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा

Gramin Varta
614 Views

दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

राजापूर : तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदीर व कला-वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पोत्यांची चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला आहे. शाळेच्या गोदामातून गाडीत भरून तांदूळ नेत असलेल्या दोन इसमांना स्थानिक जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेत तांदूळ आणि गाडीसह एकूण तीन लाख सात हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून शाळेचे मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. मकरंद धाक्रस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाटे पोलिसांनी मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि दोन ग्रामस्थ अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवार ५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजता नाटेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव सुरू असताना मकरंद मधुसुदन धाक्रस (वय ३७, रा. नाटे, भराडीन) हे मंदिरात उपस्थित होते. त्याच दरम्यान मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी मनोज आडविलकर यांनी त्यांना फोन करून नाटेनगर विद्यामंदीरात पोषण आहाराकरिता आलेला तांदूळ चोरीला जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर धाक्रस यांनी शाळेचे शिपाई रविकांत भगवान धामापुरकर यांना फोन करून शाळेत धाव घेतली. शाळेच्या पटांगणात अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एमएच-०८-एपी-६९२७ उभी होती. त्या गाडीत ५० किलो वजनाची एकूण दहा पोती पोषण आहाराची भरलेली आढळली.

या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खुद्द शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक जर अशा गैरप्रकारात सहभागी असतील तर विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार होणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संस्था चालक नेमके काय करत आहेत, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार उघड केल्याने हे बिंग फुटले असून पूर्वीही असे प्रकार झाले नसतील काय असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून तांदूळ नेमका कोणाला विकला जाणार होता याचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, राजापूर गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले तसेच इतर अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन तपशीलवार माहिती घेतली. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी नाटे सागरी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. माध्यमांशी बोलताना शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले की, “हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल.” सध्या या प्रकरणाचा तपास सागरी पोलिस ठाणे नाटे यांच्याकडून सुरू असून शिक्षण विभागाने स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्याची तयारी सुरू केली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि अन्य संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

3198613
Share This Article