GRAMIN SEARCH BANNER

शास्त्री नदीत मगरीचा मुक्त संचार; परिसरात भीतीचे वातावरण

Gramin Varta
726 Views

संगमेश्वर /एजाज पटेल : संगमेश्वर येथून वाहणाऱ्या शास्त्री नदीत मगर दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शास्त्री नदीचे पात्र अरुंद व काही ठिकाणी ओहरलेले असून, पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ही मगर नदी पात्रात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नदीतील पाणी पातळी कमी असल्याने शास्त्री नदीच्या पात्रात मगर मुक्त संचार करत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र या चर्चेला आज प्रत्यक्ष पुरावा मिळाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.संगमेश्वर येथील जमीरुद्दीन मुजावर हे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना महामार्गालगत असलेल्या शास्त्री नदीच्या पात्रात मगर पाण्याबाहेर येऊन निर्धास्तपणे वावरताना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या मगरीचे छायाचित्र टिपले. हे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित होताच मगरीच्या वास्तव्याबाबतच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

विशेष म्हणजे ही मगर केवळ नदीच्या पात्रातच नव्हे तर काठालगत पाण्याबाहेरही वावरताना दिसत असल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच नदीकाठी जाणारे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शास्त्री नदी परिसरात अनेक गावांची वस्ती असून, दैनंदिन कामासाठी नागरिकांचा नदीशी सतत संपर्क येत असतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेची गंभीर दखल वनविभागाने घेणे अत्यावश्यक असून, तातडीने पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी  नागरिकांकडून करण्यात येत आहे. मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवून, गरज भासल्यास तिला सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे तसेच नदीकाठाकडे जाणे टाळावे, असे आवाहनही जाणकारांकडून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3073097
Share This Article