रत्नागिरी: पोटच्या मुलानेच आपल्या पित्यावर खुनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरी शहरातील झाडगाव परिसरात समोर आली आहे. जागा विकून मला नवीन गाडी घेऊन द्या, अशी मागणी करत मुलाने ५० वर्षीय वडिलांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मुलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झडगाव येथील सागर निरज बिल्डिंगमध्ये राहणारे राजेश शंकर पांचाळ (वय ५०) आणि त्यांचा मुलगा ओंकार राजेश पांचाळ यांच्यात १८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वाद झाला. आरोपी ओंकार याने आपल्या वडिलांकडे शिरगाव येथील जागा विकून नवीन गाडी घेऊन देण्याची मागणी केली होती. मात्र, ‘मी कोणतीही जागा विकणार नाही’ असे वडिलांनी स्पष्टपणे सांगितल्यावर ओंकारचा राग अनावर झाला.
संतापलेल्या ओंकारने वडिलांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि घरातील लाकडी दांडका घेऊन वडिलांच्या पाठीवर जोरजोरात प्रहार केले. या हल्ल्यात राजेश पांचाळ हे गंभीर जखमी झाले असून, आरोपीने त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पित्याने १९ मार्च रोजी पहाटे शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी ओंकार पांचाळ विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२ आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ७०/२०२६ नुसार दाखल केला आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गाडी घेण्यासाठी मुलाचा बापावर जीवघेणा हल्ला, रत्नागिरीतील प्रकाराने खळबळ







