GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये पत्रकारावर भ्याड हल्ला दापोलीतील पत्रकारांचा संतप्त निषेध;तात्काळ कारवाईची मागणी

Gramin Varta
164 Views

दापोली  : चिपळूण येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर २५ मार्च रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने पत्रकारितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेचे दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत हे २५ मार्च रोजी चिपळूण नागरी पतसंस्थे च्या बाबतीतील उपोषणाबाबतचे वृत्तांकन करण्यासाठी बहादूर शेख नाका चिपळूण नाका येथे गेले असता तेथील काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, “पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

कर्तव्य बजावत असताना पत्रकारावर हल्ला होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली. या घटनेच्या निषेधार्थ दापोलीतील पत्रकारांनी पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी रत्नागिरी, यांना लेखी निवेदन सादर करत हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हल्लेखोरांना त्वरित अटक करून कायद्याचा धाक दाखवला नाही, तर अशा घटना वाढण्याची भीती आहे,” असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर दापोलीतील पत्रकार मनोज पवार, शैलेंद्र केळकर, महेश महाडिक, प्रसाद रानडे, आनंद करमरकर, राधेश लिंगायत, बाळासाहेब नकाते, सलीम रखांगे, डॉ. प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे, जगदीश वामकर, समशाद खान, रुपेश वाईकर, ज्योती बिवलकर आदींच्या सह्या आहेत. पत्रकारांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. एकूणच, चिपळूण येथील या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्यांकडूनही मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3375832
Share This Article