रत्नागिरी : शहरालगतच्या कुवारबाव येथे शुक्रवारी (दि. ६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्धाला जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम गंगाराम घोसाळकर (वय ६५, रा. साईनगर, कुवारबाव) हे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका साक्षीदारासोबत कुवारबाव येथील श्री मेडिकलसमोरून पायी चालत जात होते. त्याचवेळी रत्नागिरी बाजाराच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-४६ बीवाय-४६२३ या क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली.
हा अपघात सायंकाळी ५.१५ वाजता घडला. कंटेनर चालक सोहराब सखायत अली (वय २५, रा. उत्तरप्रदेश) याने निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या धडकेमुळे परशुराम घोसाळकर यांच्या नाकाला, कपाळाला, दोन्ही पायांच्या गुडघ्यांना आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
अपघातानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची तक्रार परशुराम घोसाळकर यांनी शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) दुपारी १.१५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी : कुवारबाव येथे कंटेनरने पादचाऱ्याला उडवले, गंभीर जखमी, चालकावर गुन्हा
