चिपळूण: गणेशोत्सव काळात रेल्वे गाड्यांवर होणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने रेल्वे प्रशासनाने मडगाव-एलटीटी साप्ताहिक गणपती स्पेशल रेल्वेच्या सहा अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामुळे प्रतीक्षा यादीवर असलेल्या अनेक गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
01004/01003 क्रमांकाची मडगाव-एलटीटी साप्ताहिक गणपती स्पेशल ही गाडी दर रविवारी धावेल. मडगावहून ही गाडी 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ही स्पेशल गाडी 25 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी दर सोमवारी एलटीटीहून सकाळी 8:20 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 12:40 वाजता मडगाव येथे पोहोचेल.
या 20 एलएचबी डब्यांच्या स्पेशल रेल्वेला करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामुळे कोकणातील गणेशभक्तांना मुंबई आणि गोव्यादरम्यानच्या प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.