रत्नागिरी : शहरातील परटवणे तिठा परिसरात सुरु असलेल्या कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. संतोष यशवंत मयेकर (वय ५१, व्यवसाय मोलमजुरी, रा. काळबादेवी, मयेकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई १० जुलै रोजी सायंकाळी ०६.१० वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परटवणे तिठा ते मिऱ्या जाणाऱ्या रोडवर, परटवणे तिठा येथील एका बंद टपरीच्या आडोशाला कल्याण मटका जुगार सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात संतोष यशवंत मयेकर हा लोकांकडून पैसे घेऊन गैरकायदा आणि बिगर परवाना कल्याण मटका जुगाराचा खेळ चालवताना मिळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह रोख ३१५०/- रुपये आणि इतर साहित्य असे एकूण ३१७०/- रुपये जप्त केले आहेत. संतोष मयेकर याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
रत्नागिरी : परटवणे येथे मटका जुगारावर कारवाई, एकावर गुन्हा
