GRAMIN SEARCH BANNER

वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ शब्द वगळला; आता महापुरुषांच्या नावाने ओळखली जाणार शासकीय वसतिगृहे

Gramin Varta
24 Views

मुंबई (प्रतिनिधी):राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना आता महापुरुषांची नावे देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील ४४९ पैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांतून ‘मागासवर्गीय’ हा शब्द पूर्णपणे वगळण्यात आला आहे. यापुढे मुलांच्या शासकीय वसतिगृहांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह’ आणि मुलींच्या वसतिगृहांना ‘सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह’ अशी नवीन नावे देण्यात आली आहेत.सध्या अस्तित्वात असलेल्या वसतिगृहांच्या नावामध्ये ‘मागासवर्गीय’ या शब्दाचा वापर केला जात होता. हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करत असल्याने त्यातून सामाजिक विषमता अधोरेखित होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. अशा नावामुळे या संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्याच चौकटीत राहतो. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वसतिगृहांच्या नावातून हा शब्द हटवून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे.राज्यात सध्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून, त्यामध्ये २३१ मुलांची तर २१८ मुलींची वसतिगृहे आहेत. या सर्व वसतिगृहांची एकूण प्रवेश क्षमता ४६,६७३ इतकी असून, यात २४,९५८ मुले आणि २१,७१५ मुली वास्तव्यास आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी या वसतिगृहांच्या माध्यमातून निवास व्यवस्था, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य आणि आधुनिक सुविधा पुरविल्या जातात. केवळ सध्याचीच नव्हे, तर यापुढे नव्याने सुरू होणाऱ्या वसतिगृहांनाही हीच नवीन नावे लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या निर्णयामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयाचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून, यामुळे शासकीय संस्थांच्या नामकरणातील जातिवाचक प्रतिमा पुसली जाण्यास मदत होणार आहे.

Total Visitor Counter

3133734
Share This Article