रत्नागिरी: महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट केंद्रामार्फत रत्नागिरीत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.रत्नागिरीत मारुती मंदिर येथील केंद्रात ट्रॅव्हल टुरिझम, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझाइनिंग, कॉस्मेटॉलॉजी अँड सलून मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग या एक वर्षाच्या व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांचे उद्घाटन आणि नवोदित विद्यार्थिनींसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम पार पडला. उद्घाटन पावसच्या देसाई बंधू उद्योग समूहाच्या संचालक तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रकल्प स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या सौ. अदिती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा व्यावसायिक प्रशिक्षणांची गरज आणि महत्त्व विशद केले.
प्रास्ताविक स्वप्नील सावंत यांनी केले. संस्थेने महिलांसाठी चालवलेल्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प प्रमुख मंदार सावंत देसाई यांनी समारोप करताना उपस्थित विद्यार्थिनींना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यशस्वी भवितव्य घडवण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमामध्ये कोर्स कोऑर्डिनेटर सौ. साधना ठाकूर यांनी विविध डिप्लोमा कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. यावेळी सदस्य सी.ए. आनंद पंडित, दीपक जोशी, सौ. स्वरूपा सरदेसाई, सल्लागार समिती सदस्या सौ. शर्वरी किरपेकर व सौ. मेधा कुलकर्णी, बीसीए कॉलेज प्रभारी प्राचार्या कु. स्नेहा कोतवडेकर, व्हिजिटिंग फॅकल्टी सौ. कविता सावंत आवर्जून उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सिद्धी करंदीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. प्रीतम पावसकर यांनी केले.कार्यक्रमात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या २२ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
रत्नागिरी : बाया कर्वे व्होकेशनल इन्स्टिट्यूटच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उद्घाटन
