GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणातील दोन भामट्यांना मुंबईतून बेड्या

रत्नागिरी: रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम राबवत ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणाचा छडा लावला असून, दोन आरोपींना मुंबईतून ताब्यात घेतले आहे. जयगड सागरी पोलीस ठाण्यात २१ मार्च २०२६ रोजी ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम परस्पर लंपास करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपासाला वेग दिला आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचे मुंबईतील लोकेशन शोधून काढले.

या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांनी तक्रारदाराच्या खात्यातून पैसे काढल्याची कबुली दिली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मुंबईत सापळा रचून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. सध्या या प्रकरणात अधिक तपास सुरू असून, या आरोपींनी अन्य कोणाची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे सायबर भामट्यांचे धाबे दणाणले असून रत्नागिरी पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3485589
Share This Article