GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात जमिनीच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Gramin Varta
262 Views

राजापूर : तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून नातेवाईकांनीच एका महिलेला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या घराच्या अंगणात घडली. याप्रकरणी २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा राजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर शंकर धामापुरकर (वय ६०), एक ७० वर्षीय महिला आणि सागर भास्कर धामापुरकर (वय २१, सर्व रा. सोलगाव, धामापुरकरवाडी, ता. राजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू आहेत. २३ डिसेंबर रोजी रात्री भास्कर धामापुरकर यांच्या घरातून मोठ्याने भांडणाचा आवाज येत होता. हा आवाज ऐकून फिर्यादी महिला त्यांच्या घराच्या अंगणात गेल्या. मात्र, फिर्यादी तेथे आल्याचा राग भास्कर धामापुरकर यांना आला. त्यांनी ‘तू तुझ्या घरात जा, इकडे थांबू नकोस’ असे म्हणत फिर्यादीशी वाद घातला आणि त्यांच्या गालावर थापट मारली. त्यानंतर गुरांना मारण्यासाठी ठेवलेली काठी उचलून फिर्यादीच्या पाठीवर मारून दुखापत केली.

यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ७० वर्षीय संशयित महिलेने देखील तिच्या हातातील काठीने फिर्यादीला पाठीवर मारहाण केली आणि शिविगाळ केली. तसेच सागर धामापुरकर याने हाताच्या ठोशाने व चापटाने गालावर मारून दुखापत केली. या घटनेनंतर काही दिवसांनी फिर्यादी महिलेने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११६(२), ३५२, ३५१(१) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3369422
Share This Article