GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Gramin Varta
59 Views

कोल्हापूर: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली असा परिवार आहे. शिवकालीन इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा, संशोधनाचा, आस्थेचा विषय. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

डॉ. जयसिंगराव पवार हे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय इतिहास लेखक. ‘मराठ्यांचा इतिहास’ हा त्यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय. मराठ्यांचा इतिहासाचा सांगोपांग अभ्यास असणारे आज अगदी बोटावर मोजता येतील इतकेच संशोधक आहेत. त्यामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्थान वरच्या दर्जाचे होते. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर साधने मिळविताना जयसिंगराव पवार यांना अनेक नवीन साधने मिळाली.

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समाजापर्यंत नेण्याचे व्रत

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, त्यांची धोरणे समाजापर्यंत नेण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. एका व्रताप्रमाणे त्यांनी हे कार्य केले. इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांचे चरित्रलेखन करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. त्याहीपुढे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, ते राजर्षी शाहू महाराजांच्या चारित्राला न्याय देण्यामध्ये. हे काम त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून केले आहे. दादोजी कोंडदेवांसंदर्भाने महत्त्वाची मांडणी डॉ पवार यांनी केली आणि मराठा इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. पंचगंगा तिरी या नावाने डॉ. जयसिंगराव पवार यांनी आत्मचरित्र लिहिले.

सांगली जिल्ह्यातील तडसर हे डॉ. पवार यांचे मूळ गाव

सांगली जिल्ह्यातील तडसर हे डॉ. पवार यांचे मूळ गाव. शेतकरी कुटुंबातला जन्म. शालेय शिक्षण संपल्यानंतर काही घटनांमुळे सगळ्या दिशाच बदलून गेल्या. दहावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कराडला जाण्याचा विचार करू लागले. त्यासंदर्भात ते मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना त्यांचे एक शिक्षक तिथे आले. त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला. राजाराम कॉलेजमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांच्या घडण्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. सगळ्या मित्रांनी घेतला म्हणून त्यांनीही बी.ए.ला अर्थशास्त्र विषय घेतला, पण त्याची काही गोडी लागेना. ते इतिहासातच रमले. एम.ए. ला शिवाजी विद्यापीठात पहिले आले आणि तेव्हापासूनच संशोधक म्हणून कारकीर्दीची सुरूवात झाली. शाहू महाराजांनी वसतिगृहे काढली नसती तर आपल्याला शिकता आले नसते, याची कृतज्ञ जाणीव डॉ. पवार यांच्या ठायी कायम असे. शाहू, शाहू आणि शाहू …. असे शाहूविचारांनी झपाटलेले झाड म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार. अनेक प्रतिष्ठित असे २१ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. पवार यांचा सन्मान करण्यात आला होता.

Total Visitor Counter

3375782
Share This Article