GRAMIN SEARCH BANNER

परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत नवा संगीत अध्याय!

Gramin Search
23 Views

संगमेश्वर:- शंभर वर्षाहून जास्त काळ चिपळूण नगरीत अव्याहत ज्ञानदानाचे काम करणारी नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणजे परशुराम एज्युकेशन सोसायटी.प.ए.सो.काळानुसार अद्ययावत होत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या हेतूने विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा आणि सर्वांगीण प्रगतीसाठी टप्प्याटप्प्याने चित्रकला कक्ष,अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, पेटंट इंग्रजी कोर्स, पंचकोशाधारित गुरुकुल विभाग आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक नवी आव्हाने प्रयत्नपूर्वक यशस्वीरित्या पूर्ण करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.

संस्थेचा एक अभिनव विचाराने सुरू झालेला विभाग म्हणजे पंचकोशाधारीत गुरुकुल. विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून अनुभवातून शिक्षण देत त्यांचे जीवन समृद्ध करणे हा गुरुकुल विभागाचा प्रधान हेतू.या गुरुकुल विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीला, छंदांना प्रोत्साहन देत त्यांना संपन्न समृद्ध घडविण्याचा प्रयत्न विभागामार्फत केला जातो. विविध प्रकारची शिबिरे, व्यक्तिपरिचय, क्षेत्रभेटी आणि असे अनेक उपक्रम शालेय अभ्यासक्रमाशी जोडत विद्यार्थ्यांना स्वतःला आजमावून बघायची संधी इथे मिळते. विद्यार्थ्यांना आवर्जून नियमित संगीत प्रशिक्षणही येथे दिले जाते. याचाच एक भाग म्हणून कै.श्रीकृष्ण चिंतामण तथा अप्पासाहेब दांडेकर यांच्या कुटुंबीयांच्या देणगीतून गुरुकुल विभागात विविध प्रकारच्या वाद्यांनी अद्ययावत सुसज्ज संगीत कक्ष तयार करण्यात आला आहे. या संगीत कक्षाचे उद्घाटन जागतिक संगीत दिवसाचे औचित्य साधून शनिवार २१ जून २०२५  या दिवशी जेष्ठ अर्थ सल्लागार जयंतराव विद्वांस आणि कैलासवासी श्री.आप्पासाहेब दांडेकर यांच्या कुटुंबीयांच्या  प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेअकरा वाजता संपन्न होणार आहे.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच भारतीय पारंपारिक अभिजात संगीताचा परिचय व्हावा, संगीत प्रत्यक्ष प्रक्रियेतून शिकता, अनुभवता यावे, अभिजात संगीत ऐकण्याची सवय लागावी अशा उद्देशाने या संगीत कक्षाच्या माध्यमातून भविष्यात काही उपक्रमांचा नियोजन संस्थेच्या सर्वच विभागातील विद्यार्थ्यांसाठी करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.

Total Visitor Counter

3370254
Share This Article