GRAMIN SEARCH BANNER

एसटी कर्मचारी आक्रमक! हप्ते रखडले, १२ फेब्रुवारीला आंदोलनाची ठिणगी

Gramin Varta
113 Views

मुंबई: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संताप आता उफाळून येण्याच्या मार्गावर असून वेतनवाढ फरकाच्या रखडलेल्या हप्त्यांवरून महामंडळ आणि सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सन २०२० ते २०२४ या कालावधीतील फरकाची रक्कम देण्याबाबत पुन्हा टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

फेब्रुवारीच्या वेतनात फरकाचा हप्ता न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. १२ फेब्रुवारी रोजी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

जानेवारीचे वेतन वितरित करण्यासाठी निधी वर्ग झाला असला तरी तो फक्त नियमित पगारापुरताच असल्याचे समोर आले आहे. वेतनवाढ फरकाच्या ४८ हप्त्यांपैकी एकही हप्ता समाविष्ट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाचे दामच नाकारले जात आहेत,” अशी भावना संघटनांकडून व्यक्त होत आहे. आश्वासने दिली जातात, पण अंमलबजावणी मात्र होत नाही, असा आरोपही करण्यात येत आहे.

दरम्यान, हप्ता न मिळाल्यास राज्यातील एसटी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. आता सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3200535
Share This Article