सावर्डे : ह.भ.प. श्री. आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालय चिपळूण तालुक्यातील नायशी येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थी भाषण व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा तसेच नागेशजी चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजित शालेय कर्मचारी सन्मान व विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागेशजी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मा. नागेश चव्हाण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष मा. माधव राजगुरू उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना माधवजी राजगुरू म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांनी व तरुण पिढीने सोशल मीडियाच्या व्यसनात न अडकता वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. आपल्या मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्या भाषेला अजून सशक्त करण्यासाठी पुस्तके वाचणे आवश्यक आहे. “हवे असेल सशक्त मस्तक तर वाचले पाहिजे पुस्तक,” असा कानमंत्रही त्यांनी दिला. तसेच स्वयं लिखित अनेक पुस्तकांचा संच विद्यालयाला भेट देऊन वाचन मंच उभारण्याचे आश्वासन दिले.
नागेश चव्हाण यांनीही आपल्या भाषणात सशक्त व सुज्ञ नागरिक घडवायचे असतील तर शिक्षणाबरोबरच संस्कारमय व व्यसनमुक्त पिढी घडवली पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली व त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नागेशजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय कर्मचारी सन्मान सोहळा पार पडला. यावेळी मुख्याध्यापक श्री. आनंदा घाटगे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वर्षभरात शालेय उपक्रम व परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेली कु. शुभ्रा मिलिंद आंबवकर हिचा विशेष सन्मान करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत कीर्ती घाग, अनिकेत पवार व अथर्व चव्हाण तर बारावीच्या परीक्षेत आर्यन लाड, मंजिरी कदम व सलोनी कदम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. याचबरोबर दहावी-बारावीतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
विद्यालयाचे हितचिंतक रज्जाकशेठ मुल्लाजी यांच्या वतीने नेहमीप्रमाणे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कळंबुशीचे माजी सरपंच विलास राजाराम चव्हाण यांनी शुभ्रा आंबवकर हिचा सन्मान केला. तर भाषण स्पर्धेत प्रथम आलेल्या आर्या रांगले हिचा सन्मान माजी सरपंच व संस्थासंचालक किशोर घाग यांनी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष सुमित चव्हाण यांनी भूषवले. प्रमुख पाहुण्यांचे तसेच मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक आनंदा घाटगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश माळीसर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप घाग यांनी केले.
या सोहळ्याला संस्थाध्यक्ष सुमित चव्हाण, उपाध्यक्ष सुरेश आग्रे, सचिव रुपेश गोसावी, खजिनदार अजय कदम, संचालक, माजी संचालक, ग्रामस्थ, पालक, प्रतिष्ठित नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशल मीडियाच्या व्यसनाऐवजी वाचन संस्कृती जोपासा : माधवजी राजगुरू यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
