GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलिसांचे मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी भरीव योगदान; ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ साठी दिले १० लाख ६२ हजार रुपयांचे सहकार्य

Gramin Varta
227 Views

रत्नागिरी: नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाडा आणि विदर्भ येथील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान लक्षात घेऊन, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मदतीचा हात पुढे केला आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत रत्नागिरी पोलिसांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी तब्बल 10,62,095/- (दहा लाख बासष्ट हजार पंच्याण्णव रूपये) इतकी भरीव रक्कम सुपूर्द केली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपल्या एका दिवसाच्या वेतनातून दिलेले हे योगदान आहे.

दिनांक 12/10/2025 रोजी मंडणगड येथे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या रकमेचा धनादेश थेट सुपूर्द करण्यात आला. रत्नागिरीचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी मुख्यमंत्री महोदयांना हा धनादेश दिला.

पोलीस दलाच्या या स्तुत्य उपक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. उदय सामंत आणि राज्याचे गृह राज्य मंत्री मा. श्री. योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे आणि आपत्तीग्रस्त बांधवांना मदतीसाठी पुढे सरसावल्यामुळे पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीची एक वेगळी आणि महत्त्वाची बाजू समोर आली आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत स्वैच्छिक योगदान देऊन जमा केलेली ही रक्कम नैसर्गिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या या योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3367949
Share This Article