खेड: लायन्स क्लब ऑफ सिटी व मुकादम लॅण्डमार्क यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जुलैला प्रथमच वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे खेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत गृहराज्यमंत्री कदम सहभागी होणार आहेत.सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाक्षेत्रात भरीव कामगिरी करत विधायक उपक्रमांद्वारे लौकिकास पात्र ठरलेल्या लायन्स क्लब ऑफ सिटीने पुरुष व महिला अशा दोन गटात वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुकादम लॅण्डमार्कचे शमशुद्दीन मुकादम यांचे सहकार्य लाभणार आहे. ”रन फॉर हेल्थ” हा संदेश देण्याच्यादृष्टीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता मुकादम लॅण्डमार्क येऊन स्पर्धेला प्रारंभ होईल.
मुकादम लॅण्डमार्क, भडगाव-चाकाळे, मुरडे व पुन्हा लॅण्डमार्कपर्यंत असा स्पर्धेसाठी मार्ग आहे. या वेळी रोहन विचारे, शमशुद्दीन मुकादम, मिलिंद तलाठी, पंकज शहा, डॉ. विक्रांत पाटील, परेश चिखले आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. विरेंद्र चिखले, महेंद्र शिरगांवकर, ओम जाधव, माणिक लोहार, हनिफ घनसार, रोहन विचारे आदी प्रयत्नशील आहेत.