GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: ओबीसींची स्वतंत्र जनगणना न केल्यास १३ मार्चला देशव्यापी आंदोलनाचा इशारा; भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी: ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना होत नसल्याचा आरोप करत भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला असून यासंदर्भात निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करण्याची घोषणा केली असली तरी, प्रत्यक्षात सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसी नोंदणीसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात आलेला नाही, ही ओबीसी समाजाची स्पष्ट फसवणूक असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करावा, ही प्रमुख मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे केवळ जनगणनेचाच नव्हे तर शिक्षकांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधण्यात आले असून, सन २०११ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेची सक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांबाबत शासनाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास येत्या १३ मार्च रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हे निवेदन सादर करताना कुणबी क्रांती संघटनेचे सलील डाफले, तेली समाज संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष अनिल पोटफोडे, भारत मुक्ती मोर्चाचे संजय कदम, बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय आयरे, तालुकाध्यक्ष भगवत जाधव, किसान मोर्चाचे विजय कुरतडकर, भीम आर्मीचे प्रदीप पवार, विद्यार्थी मोर्चाचे सौरभ आयरे, प्रोटानचे अध्यक्ष शैलेंद्र औघडे आणि पावस विभागाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3485937
Share This Article