GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत हॉटेल व्यवसाय संकटात; कमर्शियल गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे प्रशासनाकडे मागणी

Gramin Varta
4 Views

दापोली : अमेरिका इराण युद्धामुळे सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम दापोलीतील हॉटेल व्यवसायावर होत आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गांवर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोम्बे यांच्या मार्फत निवेदन सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हॉटेल व्यवसाय हा स्थानिक रोजगाराचा महत्त्वाचा स्रोत असून त्यावर किराणा, भाजी विक्री, वाहतूक आदी अनेक पूरक व्यवसाय अवलंबून आहेत.

दापोली हे प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे हॉटेल व्यवसायाचे स्थानिक अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व आहे. मात्र गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत असून आर्थिक चक्र विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणात कमर्शियल गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच गॅसचा वापर अत्यावश्यक गरजेनुसार आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

निवेदन देताना श्री सचिन तोडकर, श्री दीपक विचारे, श्री बाळासाहेब नकाते, श्री मनराज नरवणकर, श्री अतुल देवकर, रऊफ काझी, श्री महेश शिंदे, श्री पप्पू जाधव आदी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने हॉटेल व्यावसायिकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवत उपस्थिती लावली.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3218823
Share This Article