GRAMIN SEARCH BANNER

संत गाडगेबाबा हे लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठच : प्रा. कचेश्वर राऊत

Gramin Varta
77 Views

चिपळुणात गाडगेमहाराज यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी

चिपळूण : थोर समाज सुधारक वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा हे कोण्या ऐका समाजाच्या उन्नतीसाठी नाही तर या जगाच्या उन्नती साठी झटले. लोकानी शिकले पाहिजे आपला बौद्धिक विकास साधला पाहिजे हे सांगतानाच त्यांनी समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ट चालीरिती, अंधश्रद्धा याविषयी आवाज उठवला. व्यसन मुक्ती, हुंडाबंदीवर त्यांनी झोड उठवली. आपल्या कीर्तनच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते त्यांचे विचार आजही समाजाने अंगीकारले पाहिजेत असे आवाहन महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे राज्य सचिव प्रा. कचेश्वर राऊत यांनी केले.
चिपळूण येथील पेठमाप परिट आळी विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात संत गाडगेमहाराज यांची 150 वी जयंती सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिट समाजाचा 13 वा जिल्हा मेळावा संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कचेश्वर राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.

दुसरे प्रमुख वक्ते पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस यांनी निष्काम कर्मयोगी गाडगेबाबा हे निरक्षर होते तरी त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला होता. आपली सर्व पुंजी भाऊराव पाटील यांच्या स्वाधीन केली होती.   गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजसेवा केली. मात्र स्वतःच्या नावाने आश्रम, मठ उभारणे त्यांना मान्य नव्हते. ते स्वतः म्हणायचे…”मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी चेला नाही. महात्मा गांधी आणि गाडगेबाबा तसेच बाबासाहेब आंबेडकर व गाडगेबाबा यांच्या भेटी बाबत त्यांनी सखोल विवेचन केले. गावोगावी फिरून लोकांना समाजातील दोष समजावून सांगण्याचा निर्णय बाबांनी घेतला. केवळ महाराष्ट्रच नाहीत तर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व अन्य राज्यातही त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग म्हणजे कीर्तनात्मक भजनातून अंधश्रध्दा निर्मूलन केले. आपल्या व-हाडी भाषेमध्ये सहज विनोदाची, संवादाची पेरणी करत आणि जगण्यातील विसंगती मांडत त्यांनी कर्मकांडावर हल्ला केला.त्यांचे कीर्तन म्हणजे विवेचनकार आणि श्रोते यांच्यातील प्रश्नोत्तराचा सुलभ सादरीकरणाचा प्रबोधनात्मक अविष्कार होता.या अशिक्षित माणसाच्या कीर्तनाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून आचार्य प्र.के. अत्रे, पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या विद्वानांनी खाली बसून रसग्रहण केले. साध्या सोप्या शब्दांमध्ये ते विवेचन करायचे असे सांगून प्रा. होमकळस यांनी बाबांच्या शेवटच्या कीर्तनाचे काही दाखले दिले.

प्रथम संत गाडगेबाबांच्या पुतळ्याला प्रा. कचेश्वर राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला. अध्यक्ष सुभाष कदम, प्रा. विनायक होमकळस, सल्लगार आबा महाडिक, दीपक कदम, सौ. सावित्री होमकळस, कार्याध्यक्ष मनोज शिंदे यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!..”असा गजर करण्यात आला.

मान्यवरांचे स्वागत झाल्यावर अध्यक्ष सुभाष कदम यांनी गाडगेबाबा म्हणजे भारतीय समाजसुधारणेतील आधुनिक काळातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, वैराग्याचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे गाडगेबाबा, लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे गाडगेबाबा, अंधश्रद्धेवर थेट प्रहार म्हणजे गाडगेबाबा, त्यांच्या जीवनाचे ध्येय सर्वसामान्यांचे कल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि देवधर्माच्या अंध फेऱ्यात अडकून पडलेल्या समाजाला मानवतेचा श्रेष्ठ आदर्श घालणे होते असे कदम यांनी सांगून आपण पदावर असे पर्यंत पारदर्शक कारभार करून संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

150 व्या जयंती निमित्त उपाध्यक्ष वसंत पिंपळकर प्रयोजित संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेतल्या. त्याचा बक्षीस समारंभ सपन्न झाला.

महिला जिल्हाध्यक्ष अंजली पिंपळकर यांनी स्वखर्चाने हळदीकुंकू समारंभ आयोजित केले होते. त्याचा महिलांनी वाण घेऊन लाभ घेतला.
सल्लागार संतोष कदम, कार्याध्यक्ष मनोज शिंदे, लॉंड्री अध्यक्ष महेश भोसले, सल्लागार दीपक कदम, आबा महाडिक, हसमुखभाई पांगारकर, संघटक दुर्गेश्वर रोकडे, खजिनदार राजू भोसले, सौ. सुनीता महाडिक, महिलाध्यक्षा अंजली पिंपळकर, अध्यक्ष सुभाष कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष सुभाष कदम यांनी माजी अध्यक्ष आबा महाडिक, दीपक कदम व हसमुखभाई पांगारकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

वेळी सल्लागार श्रीकृष्ण शिंदे, सौ. सावित्री होमकळस, जिल्हा उपाध्यक्ष सुयोग घाग, सचिव नवनीत भोसले, सहसचिव दिनेश कदम, संघटक नथुराम जांभुळकर, युवक अध्यक्ष नितीन चाळके, महिला कार्याध्यक्ष वैशाली शिंदे, उपाध्यक्षा प्रणाली पंदीरकर,  दापोली तालुकाध्यक्ष प्रथमेश दुर्गावळे, खेड तालुकाध्यक्ष मुकेश भोसले, चिपळूण तालुकाध्यक्ष हेमंत कदम, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, लांजा – राजापूर अध्यक्ष संदेश चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेश का. कदम, रवींद्र दुर्गावळे, प्रकाश केळस्कर, सौ. आरती शिंदे, वैशाली कदम, लॉंड्री कार्याध्यक्ष अमोल कदम, सल्लागार अरुण चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन महिला जिल्हाध्यक्षा सौ. अंजली पिंपळकर यांनी केले. त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तर लॉंड्री सचिव रितेश महाडिक यांनी सर्व देणगीदार व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बंधू – भगिनींनी प्रयत्न केले.

Total Visitor Counter

3127248
Share This Article