GRAMIN SEARCH BANNER

राजापूर एसटी आगाराचा मनमानी कारभार शिगेला; पहाटेची आंबोळगड-रत्नागिरी एसटी पुन्हा रद्द

Gramin Varta
192 Views

नाटे, आंबोळगड, आडिवरे, नवेदर, कशेळी ते गावखडीपर्यंत विद्यार्थ्यांची पहाटेची रखडपट्टी

जैतापूर/ राजन लाड: राजापूर एसटी आगाराचा बेजबाबदारपणा आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रोज सकाळी ५ वाजता सुटणारी, प्रवासी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली आंबोळगड–रत्नागिरी ही पहाटेची पहिली एसटी बस आज अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाटे, आंबोळगड, आडिवरे, नवेदर, कशेळी, गावखडी या भागांतील विद्यार्थी आणि सामान्य प्रवासी पहाटेच्या थंडीत आणि धुक्यात एसटी स्टॉपवर तासन्‌तास ताटकळत उभे राहिले.

रत्नागिरी कॉलेजला जाणारे विद्यार्थी, मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या गरीब महिला आणि सकाळी लवकर रेल्वे पकडण्यासाठी निघणारे प्रवासी, या सर्वांचा एकमेव आधार असलेली ही पहाटेची बस पुन्हा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय रद्द करण्यात आली.

या संदर्भात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राजापूर एसटी आगाराचा दूरध्वनी संपूर्णपणे बंद होता. याबाबत एका विद्यार्थ्याने व्हॉट्सॲप ग्रुपवर अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, केवळ काल एसटी सहलीला गेल्यामुळे गाडी रद्द झाली असेल, असा अत्यंत निष्काळजी प्रतिसाद देण्यात आला. मात्र, गाडी रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना वेळेवर का दिली नाही, याचे उत्तर मात्र अधिकाऱ्यांनी दिले नाही.
याआधीही अनेकदा अशाच प्रकारे गाड्या रद्द होण्याचे प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःहून एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता आणि आगारातील दोन-तीन अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी त्यात जोडले होते. असे असूनही, गाडी रद्द झाल्याची किमान सूचना देण्याची जबाबदारीही आगारातील कुणीही घेत नसल्याचे दिसून आले आहे.

राजापूर तालुक्यातील अनेक मार्गांवरील गाड्या विनासूचना रद्द होण्याचे प्रकार सातत्याने सुरू असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, महिलांची रोजीरोटी आणि सामान्य प्रवाशांची गैरसोय राजापूर एसटी आगार पूर्णपणे दुर्लक्षित करत असल्याचा आरोप होत आहे. मनमानी कारभारावर अंकुश ठेवणारा कोणी आहे की नाही, असा संतप्त सवाल स्थानिकांनी विचारला आहे.
दरम्यान, राजापूर तालुक्यातील समस्यांना कोणी वालीच नसल्याचे चित्र असून, किमान क्षेत्रातील समस्यांना एका फोनवर प्रतिसाद देणारे म्हणून ओळख असणारे आमदार किरण सामंत यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक आणि प्रवासीवर्गाकडून होत आहे.

Total Visitor Counter

3132189
Share This Article