GRAMIN SEARCH BANNER

तळवडे परिसरात मुले पळवणाऱ्या टोळीमुळे दहशत

राजापूर: तळवडे आंबेवाडी परिसरात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या संशयाने नागरिक आणि पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात इसमांनी गाडीत बसवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ ते ५:१५ च्या सुमारास तळवडे आंबेवाडी शाळा क्रमांक २ च्या परिसरात ही घटना घडली. शाळा सुटल्यानंतर इयत्ता सहावीमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रणव बाबाजी राणे आणि मानस सुनील राणे हे शाळेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून चावी शिक्षकांकडे देण्यासाठी गेले होते. त्याच वेळी एक चारचाकी गाडी या विद्यार्थ्यांच्या जवळ येऊन थांबली. या गाडीमध्ये ४ ते ५ अज्ञात पुरुष बसलेले होते.

त्यांनी या दोन विद्यार्थ्यांना बळजबरीने गाडीत बसण्यास सांगितले. अनोळखी व्यक्ती आणि त्यांची संशयास्पद हालचाल पाहून दोन्ही विद्यार्थी घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. या दरम्यान गाडीतील एका व्यक्तीने खाली उतरून ‘पकडा पकडा यांना’ असा आरडाओरडा केल्याने घाबरलेले विद्यार्थी जीवाच्या आकांताने धावत सुटले आणि जवळच असलेल्या एका घरात शिरून आपला जीव वाचवला. ही संशयास्पद गाडी पाचलच्या दिशेने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी मुलांनी सांगितले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी आणि पालकांनी तात्काळ शाळेतील शिक्षकांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने संतप्त पालकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी तातडीने पालक सभा बोलवण्याची मागणीही जोर धरत आहे. या घटनेमुळे संपूर्ण तळवडे परिसरात सध्या भीतीचे आणि चिंतेचे सावट पसरले आहे.

Total Visitor Counter

3403928
Share This Article